मनोहर कुंभेजकर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात (Dindoshi Assembly Constituency) २०१४ पासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू हे आमदार आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर झालेल्या पहिल्या यादीत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. ही जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेची असून, त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवारच्या शोधात शिंदे शिवसेना आहे. तर मनसेने दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाकरेंच्या उमेदवाराला कमी मताधिक्य
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना १७०१ मतांचा लीड मिळाला होता. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दिंडोशीत शिवसेनेतून कोण इच्छुक?
या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे दिंडोशी विधानसभा संघटक वैभव भरडकर, विभागप्रमुख गणेश शिंदे यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.या मतदार संघात मराठी उमेदवार द्यावा अशी शिंदे समर्थकांची मागणी आहे.
आपल्याला तिकीट मिळावे म्हणून या दोघांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि शिंदे सेनेचे नेते व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत.
दिंडोशीत २०१९ साली शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी झाले होते.त्यांना ८२२०३ मते मिळाली होती,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांना ३७६९२ मते मिळाली,तर मनसेचे अरुण सुर्वे यांना २५८५४ मते मिळाली.त्यामुळे आता मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या उमेदवारी मुळे येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे.