आज सकाळपासून मुंबईच्या लोकल ट्रेन आणि बेस्ट बसमध्ये काही प्रवाशी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रवाशांचा हा समूह सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे ज्यांनी घातलेल्या टीशर्टवर “व्हू किल्ड जस्टिस लोया?” म्हणजेच न्यायाधीश लोयांना कुणी मारलं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या टीशर्टमुळे इतर मुंबईकर प्रवाशांचे लक्ष या कार्यकर्त्यांकडे वेधले जात असून नेमके हे प्रकरण काय आहे त्याची माहिती विचारली जात असल्याने आमचा उद्देश यशस्वी होत असल्याचा दावा विनोद चांद यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना केला.
विनोद चांद आणि त्यांचे काही सहकारी आज सकाळी अंधेरीत जमले. तेथून ते लोकलने बोरिवलीकडे गेले. सकाळची गर्दीची वेळ असल्याने स्वाभाविकरीत्या त्यांना तयार जनसमुदाय मिळत गेला. आणि टीशर्टमुळे लक्ष वेधणेही शक्य झालं. मात्र तरीही पोलिसांनी त्यांना प्रवाशांशी संवाद साधताना पाहून बोरिवली रेल्वे स्थानकात रोखलं. तेथे त्यांची चौकशी केली गेली. मात्र आम्ही रेल्वेचं तिकिट विकत घेऊन कायदेशीर प्रवास करत आहोत. टीशर्ट घातलेला असला तरी त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचा युक्तिवाद विनोद चांद यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे टीशर्ट आंदोलन चर्चगेट लोकलने चर्चगेटच्या दिशेला वळवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते चर्चगेट स्थानकात जमले होते. टीशर्ट आंदोलनाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये न्यायाधीश लोया प्रकरणाविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच राहणार आहे.
न्यायाधीश लोया यांची हत्या झाली असून चौकशीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जनजागृतीसाठी आपण हे टीशर्ट आंदोलन सुरु केल्याचे विनोद चांद यांनी सांगितले. देशातील काही मोठी माणसं या प्रकरणात गुंतलेली असल्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सामान्यांना या प्रकरणाचा विसर पडू नये यासाठी आपण हे वेगळं आंदोलन कायद्याच्या कक्षेतच सुरु केल्याचा दावाही त्यांनी केला.