नवी दिल्ली - कोविड-१९ बाबतच्या कथित टुलकिटवरून सुरू झालेला वाद आता वाढू लागला आहे. (Congress Toolkit Case) दरम्यान, याबाबत आज भाजपाने पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहेत. ही टुलकिट काँग्रेसने तयार केली. तसेच तिच्या माध्यमातून कोरोनाकाळात राजकीय लाभ घेण्याचा आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, असा दावा भाजपाने केला आहे. (Saumya Verma Connection)
दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ही टुलकिट सौम्या वर्मा हिने तयार केली असून, ती काँग्रेस खासदार एमव्ही राजीव गौडा यांच्या कार्यालयात काम करते, असा दावा केला. भाजपा प्रवक्त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर ट्विटरवर सौम्या वर्मा हे नाव ट्रेंड होऊ लागले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संबित पात्रा यांनी सौम्या वर्माच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचे काही विवरण आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि गौडा यांच्यासोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच टुलकिटच्या स्रोतांसंबंधीची काही कागदपत्रेही प्रसिद्ध केली आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये संबित पात्रा यांनी विचारले की, काँग्रेसने काल विचारले होते की टुलकिट कुणी तयार केले आहे? कृपया या पेपरवरील सामुग्री पाहा हे लेखन सौम्या वर्मा हिने केले आहे. हे पुरावे स्वत: सांगताहेत की सौम्या वर्मा कोण आहे ते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी उत्तर देणार काय?
आम्ही दाखवलेले पुरावे सिद्ध करतात की, सौम्या वर्मा ही एआयसीसीच्या रिसर्च विभागाच्या महत्त्वपूर्ण भाग आहेत. तसेच त्या मुख्य भूमिकेतही असतात. आता सौम्या वर्मा ह्या काँग्रेस कार्यकर्त्या आहेत? त्या एआयसीसीच्या रिसर्च विभागात काम करतात का? त्या राजीव गौडा यांच्या ऑफिसमध्ये काम करतात का त्यांनी हे टुलकिट तयार केले का? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. असे आव्हान पात्रा यांनी दिले.
दरम्यान, राजीव गौडा यांनी याबाबत सांगितले की, आम्ही पक्षाच्य़ा सेंट्रल व्हिस्टाबाबत एक रिसर्च नोट तयार केली होती. ती योग्य आणि पुराव्यांवर आधारित होती. मी काल ट्विट केले होते की, कोविड-१९ टुलकिट खोटे आहे आणि ते भाजपाने बनवलेले आहे, असे राजीव गौडा म्हणाले.