- विकास मिश्रगेल्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष आणि भाजपा यांच्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स युतीने लोकसभेच्या एकूण २५ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. यात तेलुगू देसमने १५ तर भाजपने २ जागा जिंकल्या होत्या. आता दोघांची युती तुटल्यानंतर तेलुगू देसम तसेच भाजपा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणा-कोणाशी हातमिळवणी करणार? हाच विषय सध्या चर्चिला जातोय. तेलुगू देसम राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करेल, अशी चर्चा होती. पण सध्याच्या वातावरणात चंद्राबाबू काँग्रेससाठी जागा सोडायला तयार नाहीत, असे बोलले जात आहे. तसे न झाल्यास काँग्रेस काय करणार, हाही मोठा प्रश्न आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँगे्रसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ८ जागांवर विजय मिळविला होता. त्याचवर्षी आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी तेलुगू देसमने सर्वाधिक म्हणजे १०२ जागा जिंकल्या होत्या. भाजपला अवघ्या ४, तर वायएसआर काँग्रेसने ६७ जागी विजय मिळविला होता.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडून भाजपाविरोधात काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांची आघाडी स्थापन होण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर त्यांच्या राज्यात त्यांना धडा शिकवण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे सरसावले आहेत. त्यासाठी ते वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांना मदत करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे. येथील राजकीय घडामोडी पाहता तेलुगू देसम व भाजपा दोघेही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. चंद्राबाबू नायडू हे आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य घडविण्यात इतके गुंतले आहेत की, त्यामुळे राज्याची धूळधाण उडण्याची वेळ आली आहे, असा आरोप त्यांनी केला.चंद्राबाबू यांची धोरणे व त्यातून होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे आंध्रचे भवितव्य अंधकारमय आहे, असेही मोदी म्हणाले. मोदी यांची मुख्यमंत्री असतानाची वक्तव्ये आणि पंतप्रधान म्हणून त्यांची कृती यात विरोधाभास असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केली आहे.>चंद्रशेखर राव यांचा फेडरल फ्रंटचंद्राबाबूंशी राजकीय हाडवैर असलेल्या चंद्रशेखर राव यांनी भाजपा व काँग्रेस यांच्याविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी (फेडरल फ्रंट) स्थापण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यात त्यांनी आंध्रातील वायएसआर काँग्रेसला सामावून घेण्याचे ठरविले आहे.
आंध्रात कोण कोणाशी हातमिळवणी करणार? काँग्रेस जाणार कोणासोबत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:29 AM