वसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रचार करीत आहेत. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यात कुणाला पाठबळ द्यावे हे २१ एप्रिलच्या मेळाव्यात ठरणार असल्याचे समजते.मनसेचेपालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी वसईत आले होते. त्यावेळी पालघर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला मदत करायची, याकरीता येत्या रविवारी दि. २१ एप्रिल रोजी मनसेने पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती दिली. दरम्यान राज ठाकरे हे मोदी- शहा विरोधात आपली लढाई असल्याचे प्रचार सभेत सांगत आहेत. परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर कुणाचा प्रचार करावा आणि त्यांनी कुणाला मदत करायची यावर त्यांचे मत अद्याप गुलदस्त्यात आहे. कदाचित अखेरच्या वेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर कुणाला मदत करायची याची रणनीती ठरणार असावी. यावेळी अविनाश जाधव सह पालघर लोकसभा जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील, वसई -विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, सचिव, नगरसेवक प्रफुल पाटील सह अन्य पदाधिकारी हे कुठल्या पक्षाला मदत करायची हे जाहिर करणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांकडून समजते आहे.
पालघरमध्ये मनसे कुणाला मदत करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:36 AM