दुसऱ्याच्या मुलाचे पेढे तुम्ही का वाटताय?; भाजपचा राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 07:19 PM2021-01-22T19:19:43+5:302021-01-22T19:20:10+5:30
तुमच्या कारखाना कार्यक्षेत्रात किती सत्ता आल्या ते जाहीर करा; भाजपचं आव्हान
कोल्हापूर: कागल मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत असल्याचा दावा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना सत्तेत राहण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची मदत का घ्यावी लागते? काँग्रेस आणि शिवसेनेसही घवघवीत यश मिळाल्याचा दावा आपण करता म्हणजे दुसऱ्याला मुलगा झाल्यावर तुम्ही का पेढे वाटता? अशी विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे केली.
मुश्रीफ कित्येक वर्षे आमदार, मंत्री, कागल-गडहिंग्लज तालुक्यातील दोन कारखाने अनेक छोट्यामोठ्या सत्ता तुमच्याकडे आहेत. असे असताना कागल तालुक्यातील किंबहुना तुमच्या संताजी घोरपडे साखर कारखाना क्षेत्रातील किती ग्रामपंचायती तुम्ही स्वबळावर जिंकल्या आहेत ते सांगा, अशीही विचारणा या पत्रकात केली आहे. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष नाथाजी पाटील, राहुल देसाई, अजिंक्य इंगवले, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, युवा मोर्चाचे पृथ्वीराज यादव, झाकीर जमादार, महेश पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
ग्रामपंचायतीच्या निकालावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भाजप व समरजित घाटगे यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. त्याला प्रत्युतर देताना भाजपने म्हटले आहे, ‘ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यात सत्ता नसतानाही सर्वाधिक जागा मिळविल्या. म्हणूनच मुश्रीफ यांना पोटशूळ उठला असेल तर टीका करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढे यावे. उगीच कोणाला तरी बोलवता धनी करू नये. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे शेतकऱ्यांचे विषय घेऊन बांधावर जात आहेत. त्याची त्यांनी धास्ती घेतली असल्यानेच ते सातत्याने घाटगे यांच्यावर कोणाला ना कोणाला तरी पुढे करून टीका करीत आहेत.
''एवाय यांना भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही''
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना भाजपवर टीका करायचा अधिकार नाही. भाजप प्रवेशासाठी मंत्रालयातील नऊ अ दालनासमोर ते किती वेळा ताटकळत बसत होते, हे त्यांना आठवत असेलच. त्यामुळे त्यांनी भाजपवर केलेली टीका ही त्यांची नसून कागलकरांची आहे.