पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:04 AM2021-05-09T09:04:36+5:302021-05-09T09:09:23+5:30

Sanjay Raut : भाजपाने श्रीरामास प्रचारासाठी प. बंगालच्या रस्त्यांवर आणले, पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने 'खेला होबे' हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या 'खेला होबे'ने 'जय श्रीराम'च्या नारेबाजीवर मात केली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Why did Modi-Shah lose in West Bengal ?, said shivsena leader sanjay raut | पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण

पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण

Next
ठळक मुद्दे"मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात."

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच, मोदी-शहा पश्चिम बंगालमध्ये का हरले? याचे कारण सांगत दैनिक सामनामधील रोखठोक या स्तंभामधून संजय राऊत यांनी भाजपाच्या पश्चिम बंगालमधील पराभवाची समीक्षा केली आहे. तसेच, भाजपाने देशातील राजकीय संस्कृती व परंपरांचे मारेकरी ठरू नये. प. बंगालात परंपरा मोडली, याचा फटका भाजपला बसला हे स्वीकारा. ममता बॅनर्जी यांच्या समोर 'श्रीराम'चा नारा दिला. तोदेखील चालला नाही. याचे कारण असे की, प. बंगालात 'जय श्रीराम'चे आकर्षण कधीच नव्हते. तेथे दुर्गा पिंवा कालिमातेचे वलय. भाजपाने श्रीरामास प्रचारासाठी प. बंगालच्या रस्त्यांवर आणले, पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने 'खेला होबे' हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या 'खेला होबे'ने 'जय श्रीराम'च्या नारेबाजीवर मात केली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut : Why did Modi-Shah lose in West Bengal?)

संजय राऊतांचे रोखठोक भाष्य...

>> पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचा एकतर्फी विजय झाला. निवडणूक आयोग, लाखोंच्या संख्येने उतरवलेले केंद्रीय सुरक्षा दल, सीबीआयसारख्या संस्थांचा वारेमाप वापरही भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोदी-शहा यांनी धार्मिक मतविभागणीसाठी ‘जय श्रीराम’ला प्रचारात उतरविले. 25 वर्षांच्या देवांशू भट्टाचार्यने त्यावर ‘खेला होबे’चा उतारा दिला व पारडे फिरले. मोदी-शहा म्हणजे जय हे समीकरण ‘खेला होबे’ने तोडले.

>> पश्चिम बंगालात राज्यक्रांती होत आहे, असे स्फोटक वातावरण बनवले. पण भाजपला 80 जागाही जिंकता आल्या नाहीत व ममता बॅनर्जी या 215 जागा जिंकून वरचढ ठरल्या. यावर कोलकाताच्या एका बंगाली संपादकाने मला फोन करून सांगितले, ”महाराष्ट्राप्रमाणेच बंगालातही चाणक्याचे काहीच चालले नाही. एकच खरा चाणक्य आहे. त्याचे नाव पंडित विष्णुगुप्त. बाकी सगळे झूठ आहेत!’ पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी नाहीत. देशात मोदींची लाट ओसरली आहे व अमित शहा यांनी शर्थ करूनही त्यांना प. बंगालात मोठा विजय मिळवता आलेला नाही, हे या निवडणुकांनी दाखवून दिले.

>> ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल. होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता. अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले. 

("योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल)

>> अहिल्याबाईंचा आपल्या समोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ, असा त्यांचा विश्वास होता. अहिल्याबाईंकडे त्यावेळी फक्त पाचशे महिलांचे पथक होते. त्यांच्या ताकदीवर अहिल्याबाई युद्धास सज्ज झाल्या. त्याआधी त्यांनी नर्मदेपलीकडे डेरा टाकलेल्या राघोबा दादास निरोप पाठवला, "तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हातात भाला आणि माझ्या पाचशे वीर महिलांना घेऊन मैदानात उतरले तर तुमची पळता भुई थोडी होईल. हरलात तर काय होईल? मी बाई माणूस असल्याने मला कोणीच हसणार नाही. पण तुमचा पराभव माझ्याकडून झाला तर जगास तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही." राघोबा दादाला हा निरोप मिळताच त्याचे डोके ठिकाणावर आले. त्याने मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालात यापेक्षा वेगळे काय घडले?

>> संपूर्ण तृणमूल काँग्रेस फोडण्यात आली. तृणमूलचे नटबोल्ट ढिले केले. तृणमूलमधून फुटलेल्या आमदार व मंत्र्यांना उमेदवाऱयांची रेवडी वाटली. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी व एक मुकुल रॉय सोडले तर इतर सगळे पराभूत झाले. या सगळय़ांसाठी मोदी-शहा व योगी आदित्यनाथ यांनी हजारोंच्या सभा घेतल्या. प. बंगालातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱयास मी निकालाच्या रात्री फोन करून विचारले, ”भाजपचा हा पराभव दारुण आहे, पण मोदी-शहांच्या सभांत व रोड शोना तर रोज तुफान गर्दी होत होती. त्या गर्दीचे पुढे काय झाले?” त्या अधिकाऱयाने एका वाक्यात स्पष्ट केले, ‘ही गर्दी स्थानिक नव्हती. झारखंड, बिहार, ओडिशा या बंगालच्या सीमेवरील राज्यांतून रोज गर्दी विकत आणली जात होती!’ प. बंगालात हिंदी भाषिक मोठय़ा प्रमाणावर रोजीरोटीसाठी आले आहेत. ‘जय श्रीराम’च्या गर्जनेचे त्यांना आकर्षण वाटले. ममता बॅनर्जींनी या हिंदी भाषिक मतांकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत आहेत ते रोखायला हवे, हा त्यांचा प्रचाराचा पहिला मुद्दा. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, हा दुसरा मुद्दा. त्या मुद्द्यांचे रॉकेट उडाले. ज्यात भाजपची लंका जळाली.

>> मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात. अमित शहा यांनी उभे केलेले कोणतेही मुद्दे प. बंगालात चालले नाहीत व देशभरातून गोळा केलेली भाजपची फौज प. बंगालातून पराभूत होऊन परत फिरली. हे पानिपतच्या लढाईसारखेच झाले. लोकशाहीतील सर्व परंपरा येथे मोडून पडल्या. भारतीय जनता पक्षाने देशातील राजकीय संस्कृती व परंपरांचे मारेकरी ठरू नये. प. बंगालात परंपरा मोडली, याचा फटका भाजपला बसला हे स्वीकारा. ममता बॅनर्जी यांच्या समोर ‘श्रीराम’चा नारा दिला. तोदेखील चालला नाही. याचे कारण असे की, प. बंगालात ‘जय श्रीराम’चे आकर्षण कधीच नव्हते. तेथे दुर्गा पिंवा कालिमातेचे वलय. भाजपने श्रीरामास प्रचारासाठी प. बंगालच्या रस्त्यांवर आणले, पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने ‘खेला होबे’ हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या ‘खेला होबे’ने ‘जय श्रीराम’च्या नारेबाजीवर मात केली. ‘खेला होबे’ म्हणजे ‘आता खेळ होईल.’ ‘खेला होबे’ने संपूर्ण प. बंगालात धुमाकूळ घातला, हे लक्षात घेतले पाहिजे.

>> एकंदरित देशभरातील निवडणुकांत काँग्रेस मागे पडली. प. बंगालातील पराभव हा अपमानास्पद, `Humiliating Loss’ असे काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. 290 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस आणि डाव्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही. ममता जिंकल्याचा आनंद आहेच, पण काँग्रेसच्या अधःपतनाची वेदना तितकीच तीव्र आहे. 2024 च्या राजकीय पटलावर तेव्हा काँग्रेस कोठे असेल? ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीला नवी दिशा मिळेल काय? विरोधी पक्षाने एकत्र यायचे ठरले तर त्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? हे एकमताने ठरू द्या व त्या एकमतास काँग्रेसचाही होकार लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

>> विधानसभा निवडणुकांत सातत्याने पराभव होऊनही लोकसभा निवडणुका भाजप नव्हे तर मोदी जिंकत आहेत. हे मोदींचे यश आहे. कारण मोदींना आव्हान देईल असे नेतृत्व आज दिल्लीत नाही. असे नेतृत्व निर्माण झाल्याशिवाय सामना रंगणार नाही. मोदी किंवा शहांनी कितीही ताकद लावली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो हे प. बंगाल, केरळ व तामीळनाडूने दाखवून दिले. याचा अर्थ मोदी हे नक्कीच लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचे निवडणूक जिंकण्याचे व्यवस्थापन निर्दोष नाही. समोरचे कमजोर नेतृत्व, विरोधकांकडे साधनांची कमतरता हेच मोदी-शहांचे राजकीय बलस्थान आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.

>> प. बंगालच्या जनतेला ‘जय श्रीराम’चा नारा व धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. प. बंगालच्या जनतेला त्यापेक्षा वेगळे काही हवे आहे. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार व बदनामी ही शस्त्र आता जुनाट व बोथट झाली. याच न्यायाने उद्या मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचे नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल!

Web Title: Why did Modi-Shah lose in West Bengal ?, said shivsena leader sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.