पुणे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे निर्माण झालेला वाद चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही तितकेच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. पवार साहेबांबाबत बोलण्याएवढी आपली किंमत आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला होता. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. तुम्ही निखारा टाकलात तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा अमोल कोल्हे यांनी विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या प्रचारसभेत केले.शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, राजकारणात येण्यापूर्वी ते मला मोठे नेते वाटायचे. मात्र प्रत्यक्षात ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.