मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झालं आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूड स्टार कंगना रनौतने ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असं म्हटलं होतं.
यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो असं निलेश राणे म्हणाले आहेत.
काय म्हणाली होती कंगना?
कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. काही माझ्या वयाचे युवा वैयक्तिकरित्या ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले गेले होते. डीलर सारखे असतात. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात़ तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुस-यांसोबत दुर्व्यवहार करतात. काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार बालपणापासून ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. अशाच एका अभिनेत्याला मी डेटही केले आहे, असेही ती म्हणाली होती.
सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच...
गेल्या १३ दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सर्व व्यक्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, संशयितांकडे शेकडो तास चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या फेरतपासणीनंतर त्याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) विशेष पथकाने काढला आहे. मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया, तिचा भाऊ, आईवडील, मॅनेजर, सीए, नोकर, वॉचमन यांचे जबाब, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचे जबाब तसेच मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या कागदपत्रांबाबत दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक टीमकडून सकारात्मक रिपोर्ट आल्याने ही हत्या नसून आत्महत्या असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र व बिहारमधील राजकीय वर्तुळात महत्त्वाचा विषय बनलेल्या सुशांत सिंगच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १९ ऑगस्टला घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जम्बो पथक मुंबईत ठाण मांडून तपास करीत आहे. सुशांतची हत्या झाली असावी, या शक्यतेने घरातील नोकर दीपेश सावंत, नीरज सिंग, मॅनेजर सॅम्युयल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, सीए संदीप श्रीधर, जया सहा, श्रुती मोदी आदींसह मुख्य संशयित रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत आणि आई संध्या चक्रवर्ती यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.