पुणे – महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे. गेल्या १५-२० वर्षात शाळा-कॉलेजमध्ये जाती आल्या. मित्रामित्रांमध्ये जाती आल्या. महाराष्ट्रानं देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले ते राष्ट्रीय स्तरावर गेले. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर पडला पाहिजे यासाठी ते विधान होतं. यात प्रबोधनकारांच्या वाचनांचा प्रश्न कुठून आला? बरं प्रबोधनकारांचे सोयीनुसार तुम्ही वाचन करता का? असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांना लगावला आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) पत्रकार परिषदेत म्हणाले की, नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या नावावर निवडून लढवली नव्हती. जात, धर्म हे वातावरण तयार करण्यात येत आहे. शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राला एकत्र आणायचं असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले. मग तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज न होता शाहू-फुले आंबेडकर विचार घेऊन पुढे जाणार मग छत्रपती शिवाजी महाराज मूळ विचार पुढे का घेऊन जात नाही असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला.
तसेच बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांच्याकडे मी ब्राम्हण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. शरद पवारांना भेटतो ते मराठा म्हणून भेटतो का? जात पाहून आपण कुणाच्या घरात जातो का? या जातीपातीच्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. मी काय वाचलं हे मला माहित्येय आहे. प्रबोधनकार ठाकरे हे तुम्हाला परवडणारे नाहीत. आणायचे असेल तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल. प्रत्येक काळातील ती गोष्ट असते. चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. ५० साली पहिली आवृत्ती आली तेव्हापासून पुढे आलं नाही. लोकांची माथी भडकवायची. राजकारणासाठी एजेंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवलं जातं. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. त्यामुळे मी बोललो हे सगळं प्लॅन आहे असाही राज ठाकरेंनी आरोप लावला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीचा विचार जास्त प्रमाणात पुढे आला याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. निवडणुकीसाठी जातीपातीचं राजकारण केले जाते. निवडणुकीच्या काळात दोन-चार टाळक्यांचं भलं होतं. ७४ वर्षात आपण जातीपातीचं राजकारण करतोय त्यातून बाहेर पडावं हेच वाटतं असंही राज ठाकरे म्हणाले.