PM Narendra Modi Speech in Lok Sabha: लोकसभेत का म्हणाले नरेंद्र मोदी, "ना खेलब ना खेलन देब, खेलबे बिगाड़ब"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:47 PM2021-02-10T18:47:03+5:302021-02-10T18:49:07+5:30
PM Narendra Modi Speech in Lok Sabha: युपीए सरकारच्या काळातील तत्कालिन कृषी मंत्री शरद पवार यांच्याच वक्तव्यांचा आधार घेत पंतप्रधानांनी साधला विरोधकांवर निशाणा.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर नरेंद्र मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी कायदा लागू झाल्यानंतर एमएसपीची खरेदी आणखी वाढली असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. तसंत त्यांनी एका भोजपुरी म्हणीचा वापर करत विरोधकांना खेळ बिघडवणारे असं संबोधलं यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाचं उत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीएमध्ये कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांच्या जुन्या वक्तव्यांचा आधार घेत विरोधकांना घेरलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या त्या वक्तव्यांचा आधार घेतला ज्यात त्यांनी एपीएमसी अॅक्टमध्ये बदल आणि काही खासगी मंडयांचं समर्थ केलं होतं. "विरोधी पक्षांचं सरकार ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांत कोणते ना कोणते रिफॉर्म्स करण्यात आले आहेत. आम्ही ते आहोत ज्यांनी १५०० कायदे संपवले आहेत. आम्ही प्रोगरेसिव्ह पॉलिटिक्सवर विश्वास करतो. भोजपुरीमध्ये एक म्हण आहे काही लोकं तशी आहेत ना खेलब, ना खेलन देब, खेलबे बिगाडब," असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “एपीएमसी कायदा बदलल्याचं कोण अभिमानानं सांगत होतं, २४ बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं? हे तर तत्कालिन युपीए सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता निवडण्याची शंका येते," असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळेदेखील याच ठिकाणी उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू
"कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू आहे. कृषी कायदा लागू झाल्यानंतर बाजारपेठा, एमएसपी बंद झाली नाही. उलट एमएसपीची खरेदी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र कृषी कायद्याबाबत खोटं पसरवलं जात आहे. यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांपर्यंत याबाबत सत्य पोहचलं तर भांडाफोड होईल. त्यामुळे गोंधळ घातला जात आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. तसंच अशाने तुम्ही लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संवेदनशील असायला हवं
सरकारांनी संवेदनशील असायला हवं, जनतेनं कधीच काही मागितलं नाही. जुनाट व्यवस्था बदलल्या नाहीत तर देश कसा चालेल. आपण त्यांना द्यायला हवं असं मोदी म्हणाले. कृषी कायदे कुणालाही बंधनकारक नाही, पर्याय आहेत. जिथे पर्याय आहेत, तिथे विरोधाचं काय कारण? जिथे फायदा होईल, तिकडे शेतकऱ्यानं जावं असे कायद्यामध्ये आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.