नवी दिल्ली:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदने आघाडी केली आहे. पण, या आघाडीपासून शिवसेनेनं दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवरही बोलले. 'सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा?', असा सवालच त्यांनी केला. तसेच, 'शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय, असंही ते म्हणाले.
सरकार विरोधकांना या गोंधळास प्रवृत्त करतंयअधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक संसद योग्यरित्या चालू देत नसल्याचा आरोप सरकारकडून होताना दिसत आहे. पण, संजय राऊत यांनी यासाठी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. 'सरकार विरोधी पक्षांवर ठपका ठेवत हे, मुळात सरकारलाच संसद चालू द्यायची नाही. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. पेगासस असेल, कृषी कायदे असेल, विरोध पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसतंय. विरोधकांना गोंधळ घालण्यास सरकारच प्रवृत्त करतंय, असा आरोपही त्यांनी केला.