जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी थेट बोलणे टाळणाऱ्या केंद्र सरकारने आज 100 कोटींच्या वसुलीवरून मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) सरकारवर जोरदार टीका केली आहे. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. (If Rs 100 cr was the target by Home Minister (Maharashtra) then what was the target by other ministers. Uddhav Thackeray’s govt has lost the moral authority to govern the State even for a day: Union Minister Ravi Shankar Prasad, in Patna)
प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले. शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या की शरद पवारांच्या (Sharad Pawar) दबावातून वाझेला मुंबई पोलिस दलात आणले असा सवाल उपस्थित केला आहे. हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाहीय. हे ऑपरेशन लुटालूट आहे. हा वसुलीचा गुन्हा असून या प्रकरणात शरद पवारांना सत्तेचा हिस्सा नसताना माहिती पुरविली जात आहे. मग ते जर सत्तेचा भाग नाहीत तर त्यांना कोणत्या आधारे माहिती पुरविली जात आहे. दुसरी बाब म्हणजे शरद पवारांनी आपल्या स्तरावर काय कारवाई केली आहे, त्यांनी गुन्हा रोखण्यासाठी काय चौकशी केली आहे, असा सवाल प्रसाद यांनी केला.
उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र आहात. राज्यात तुम्ही बेईमानीचे सरकार स्थापिले आहे. बाळासाहेंबांच्या प्रतिमेला ठेच पोहोचेल असे वागत आहात. एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझेची (Sachin Vaze) बाजु मांडतात आणि त्यांचा गृहमंत्री त्याच वाझेला मला 100 कोटी (100 crore) रुपये आणून दे असे सांगतो. ही गंभीर बाब आहे. हे प्रकरण भाजपा गंभीरतेने घेणार आहे. या प्रकरणाची ईमानदारीने चौकशी होण्याची गरज आहे. यासाठी भाजपा महाराष्ट्रातील रस्त्यांवर उतरणार आहे, असे प्रसाद म्हणाले.
तसेच या प्रकरणाची स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी झाली पाहिजे. कारण यामध्ये शरद पवार यांची भूमिका आणि मुंबई पोलिसांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या प्रकरणी अनेक प्रश्न विचारता येतील, असे प्रसाद म्हणाले.