रत्नागिरी: दोनच दिवसांपूर्वी रंगलेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं. पण शिवसेनेनं कोकणाला काय दिलं, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचे आमदार विधानसभेत तोंड उघडत नाहीत, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं.
तुम्ही शिवसेनेवर टीका करत असताना मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट होते. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा होते. त्याबद्दल काय वाटतं असा प्रश्न राणेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भेटूच शकतात. मुख्यमंत्रीपदाइतकंच विरोधी पक्षनेतेपदही महत्त्वाचं आहे, असं उत्तर राणेंनी दिलं.
भविष्यात भाजप-शिवसेनेची युती झाली तर काय करणार, असा सवाल राणेंना विचारण्यात आला. त्यावर मी जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. पण युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल, असं राणेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेची जुनी प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा देणाऱ्या राणेंनी थोडा सावध पवित्रा घेतला. वहिनीवर ऍसिड हल्ला करण्याचा आदेश कोणी व कधी दिला, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या राणेंनी याबद्दलचे प्रश्न टाळले. मी काही गोष्टी कंसात बोलतो. त्याबाहेर बोलत नाही, असं म्हणत राणेंनी जास्त बोलण्यास नकार दिला.