मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्याशिवसेना प्रवेशावरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित उर्मिलाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरलेला असताना याबाबत उलटसुलट वृत्त येत आहेत. आपण पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्वतः उर्मिलाने एका संकेतस्थळाला सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मात्र उर्मिला या शिवसेनेत येणार असून ‘कदाचित’ उद्या तो प्रवेश होऊ शकतो, असे म्हटले.
मुख्यमंत्र्यांचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी उर्मिला मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कलावंत श्रेणीतून उर्मिला यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप सरकारने पाठवलेल्या यादीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे कदाचित उर्मिला शिवबंधन बांधण्याचे टाळत असावी, अशी चर्चा आहे. याबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन ती आपली भूमिका मांडणार आहे.