पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरात
By कुणाल गवाणकर | Published: January 8, 2021 08:39 PM2021-01-08T20:39:57+5:302021-01-08T20:45:49+5:30
औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार; मुख्यमंत्री ठाकरे ठाम
मुंबई: औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. परवा मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील वैद्यकीय खात्यासंदर्भात निर्णय झाला. याची माहिती देताना CMO च्या ट्विटर हँडलवरून मंत्री अमित देशमुख यांच्यासह संभाजीनगर (औरंगाबाद) असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही काल CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं CMOनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख करत असल्यानं काँग्रेस नाराज आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. 'मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले.
Aurangzeb was not secular so Aurangzeb does not fit in the secular agenda: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on the issue of renaming of Aurangabad pic.twitter.com/0Up18lEYGg
— ANI (@ANI) January 8, 2021
CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संभाजीनगर म्हटल्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'छत्रपती संभाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आमचा नामांतराला आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाला विरोध आहे. महाविकास आघाडीनं किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे मतभेदांचे मुद्दे चर्चेतून सोडवू. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पटवून देऊ,' असं थोरात यांनी म्हटलं.
CMO च्या ट्विटरवर पुन्हा संभाजीनगर उल्लेख
औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख केल्याचा मुद्दा बुधवारी माध्यमात झळकत असताना संध्याकाळी पुन्हा CMO च्या ट्विटर हॅडलवर त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या असं विधान त्यांनी केले. त्यामुळे शिवसेनेकडून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न झाला का? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.
"काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे...(१/२) pic.twitter.com/aS5rZJGfnZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 7, 2021
चुकून टाइप झालं असेल, समज देऊ – अस्लम शेख
गुरूवारी सकाळी माध्यमात या संदर्भात बातम्या आल्या तेव्हा काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सावध प्रतिक्रिया देत 'कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ' असं सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.