मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन सुरु होतं, मात्र आता हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेत राज्य सरकार विविध गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेत आहे, मात्र अद्यापही मंदिरांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने मनसेने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले की, पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आंदोलन करण्यात येणार होते, मात्र याठिकाणी कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात आली, याठिकाणी भाजपा ज्याठिकाणी आंदोलन करणार तेथील मंडपही प्रशासनाने काढून घेतला. त्यामुळे भाजपाला हे आंदोलन स्थगित करावं लागलं. मात्र आंदोलन स्थगित करताना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.
तुषार भोसले म्हणाले की, आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल. सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात येत होतं, आम्ही कुणाला घाबरत नसून भाविकांची गैरसोय नसावी म्हणून आंदोलन स्थगित करत आहे, मात्र मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच या सरकारला कोणाविषयी संवेदना उरल्या नाहीत, साधुसंतांनाही अटकेची धमकी दिली जाते, पत्रकारांना अटक होते, सरकारमुळे कोणताही घटक संतुष्ट नसेल तर निश्चितच मुघलांपेक्षा आणि ब्रिटिशांपेक्षा हे वाईट सरकार आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर केला.
भाजपाच्या आरोपाचा राष्ट्रवादीने घेतला समाचार
मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत. मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध... जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते असा सवालही राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी भाजपाला केला आहे. थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे मग मंदिरांनीच काय केले असा सवालही करत आहेत परंतु मंदिरात येणारा भाविक असतो त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही. वास्तविक कुठल्याही मंदिराचा वास्तू रचनेतून पाहिले तर आतला गाभारा हा लहान असतो. तिरुपती देवस्थानासारखं रांगेत या लांबून दर्शन घ्या ही पद्धत आपल्याकडे नाही. आपल्या धार्मिक स्थळावर त्याला एसओपी म्हणतात तसं तयार केलेले नाही, एखादा राजकीय पक्ष अशाप्रकारच्या भूमिका कशासाठी घेतो. अध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते वाहिन्यांवर उघड मुलाखती देतात. कुठेतरी वास्तवाकडे गेलं पाहिजे. परमेश्वर जसा तुमचा आहे तसा तो सगळ्यांचा आहे. श्रध्दा सगळ्यांचीच परंतु असं ओंगळ प्रदर्शन करण्याची गरज नाही असे सांगतानाच त्यावर मार्ग शोधला पाहिजे, समजुतीने घेतले पाहिजे. सरकार यावर मार्ग काढणार आहे याबद्दल खात्री बाळगली पाहिजे असंही राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितले.