मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना मनसेच्या इंजिनाचे पाठबळ पाहिजे तसे मिळाल्यास साहजिकच काँग्रेसचे पारडे जड होणार आहे. पण केवळ मनसेच्या इंजिनावर काँग्रेसची रेल्वे रुळावर येणार नाही, तर यासाठी ऊर्मिला यांना जंग जंग पछाडावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे मताधिक्य कमी करण्यासह ऊर्मिलाला विजयी करण्यासाठी काँग्रेसला मनसेचा पाठिंबा कितपत मिळतो? हा औत्सुक्याचा विषय आहे.भाजपचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांच्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत आहे.भाजपला शिवसेना, आरपीआय, रासप यांचा पाठिंबा असून, काँग्रेसला राष्ट्रवादीचा तसेच मनसेचा पाठिंबा आहे. गत लोकसभेला शेट्टी चार लाख मतांनी आघाडीवर होते. आता ऊर्मिला यांच्यासमोर शेट्टी यांचे मताधिक्य कमी करतानाच विजयी होणे; हे ध्येय आहे. मनसेची मते मताधिक्य कमी करण्यासाठी हातभार लावणार असली तरी काँग्रेसची खरी मदार ही उर्वरित मतदारांवर असून, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात ऊर्मिला कितपत यशस्वी होतात हे पाहावे लागेल.
>मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?२००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून मनसेचे उमेदवार शिरीष पारकर यांना १ लाख ४७ हजार ५०२ मते मिळाली होती. परिणामी शिवसेना-भाजप युतीचे मताधिक्य कमी झाले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उत्तर मुंबई मतदारसंघातून मैदानात उतरली नव्हती.परिणामी, या वेळी येथील मराठी मते शिवसेना-भाजप युतीकडे वळल्याने भाजपचे मताधिक्य वाढले.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेस, राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. मनसेची मते ऊर्मिला यांच्या बाजूने झुकतील. पण त्याचा फायदा त्यांना होईल का हे वेळच ठरवेल.