प्रविण मरगळे
मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरु आहे. त्याचसोबत युवासेना पदाधिकारी संवाद दौरा राज्यभरात होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीसाठी तयारी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल. विरोधकांच्या कुठल्याही प्रयत्नांना यश येणार नाही असा विश्वास युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात युवासेनेचा पदाधिकारी दौरा पार पडणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर या शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. नाशिकमध्ये पुढील महापौर शिवसेनेचाच असेल. इतर पक्षातील अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे. शहरात शिवसेनेची चांगली बांधणी झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना विजयी होणार असल्याचं वरुण सरदेसाईंनी सांगितलं. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंशी ‘लोकमत ऑनलाईन’नं साधलेला संवाद
युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्याबद्दल काय सांगाल?
एक महिन्याभरापूर्वी युवासेना पदाधिकारी संवाद दौरा पुण्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ दौरा झाला. सध्या उत्तर महाराष्ट्र जिल्हा दौरा सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे झाले पाहिजेत अशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. या दौऱ्यात आम्ही केवळ युवासेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. कोविड काळात ऑनलाईन संवाद सुरु होता. परंतु ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद होत नव्हता. या दौऱ्याच्या निमित्ताने हा संवाद वाढवण्यात आला. संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून नवीन मतदारांना पक्षाकडे कसं आकर्षित करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. कुठलीही शासकीय काम रखडली असतील, सत्तेत आहोत, देशातले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. या लोकप्रियतेचं मतांमध्ये रुपांतरीत करण्याचं काम युवासेना करत आहे. या संवाद दौऱ्यात स्थानिक शिवसेनेचे नेते नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या सूचना, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोविड काळानंतर पहिल्यांदाच थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातोय, महाविकास आघाडी सरकारबद्दल या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत?
शिवसेना, युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचं सरकार आल्याचा आनंद आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढली आहे त्याचा फायदा पक्षाला होईल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ग्रामपंचायत निवडणुकींमध्येही शिवसेनेने चांगले यश मिळवलं आहे. इतर पक्षाचे नेते शिवसेनेशी जोडले जात आहे. जे काम करतायेत त्यांना थेट पदावर बढती देण्याचं काम संवाद दौऱ्यातून केलं जात आहे. युवासेनेची नवीन टीम करण्याचा प्रयत्न राज्यभर सुरू आहे. पदाधिकाऱ्याला ५ वर्ष झाली असतील तर त्यांना बढती देऊन जबाबदारी वाढवली जात आहे.
दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना निवडणुकीसाठी तयारी करतेय का?
ज्यादिवशी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासून विरोधक सरकार पाडण्याचं प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या प्रयत्नांना यश आलं नाही आणि यापुढेही ते येणार नाही. हे सरकार ५ वर्ष चालेल. परंतु प्रत्येक पक्षाला त्यांची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही संवाद दौऱ्यात शिवसेना स्वबळावर लढेल किंवा कुठे आघाडी करेल याविषयी आम्ही भाष्य करत नाही. हा संपूर्ण दौरा युवासेनेची नवी टीम करण्यासाठी आहे. युवासेनेला १० वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता जुने पदाधिकारी पालक संघटना शिवसेनेचं काम करत आहेत. त्यामुळे आता नवीन पदाधिकारी नेमण्यात येत आहेत. निवडणुका कधी येतील सांगता येत नाही. आगामी महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्याच आहेत. विधानसभा निवडणुका पूर्ण कार्यकाळ झाल्यावर लागतील. पक्षप्रमुख जे आदेश देतील ते त्याप्रमाणे आम्ही तयारी करू
नाशिकची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरेंकडे दिली जात आहे, त्याकडे कसं पाहता?
गेल्यावेळची महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची चांगली तयारी होती. परंतु अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या काही जागा पडल्या आणि भाजपा सत्तेत आली. तरी नाशिक शहरात शिवसेनेची चांगली पकड आहे. सुनील बागुल, वसंत गीते पुन्हा शिवसेनेत परतलेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. त्याचसोबत नाशिकमधील अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अलीकडेच महापालिका प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेत बाजी मारली आहे. नाशिक शहरात शिवसेनेसाठी आशादायी चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील हे चित्र दिसेल. मनसेने कोणाला जबाबदारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. एखादा नेता योग्य वाटत असेल निवडणुकीची धुरा सांभाळायला तर ते निर्णय घेतील. आमचं काम शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून नाशिकमधील पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वास आहे.
मुंबई विमानतळावर अदानी नावाची पाटी शिवसैनिकांनी तोडली. परंतु त्याठिकाणी GVK बोर्ड होता तेव्हा शिवसेना गप्प का होती?
अदानी असो, GVK असो किंवा अन्य कुणी...यांना विमानतळाची मालकी दिली नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे. ते नाव कुठेही कमी नको, हे फक्त शिवसैनिकांनाच नाही तर सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना वाटतं. GVK फक्त नाव लावलं जात होतं. परंतु अदानी यांनी ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ नाव असताना अदानी एअरपोर्ट नाव लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे आमच्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं आंदोलन केले. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ नाव आहे. ते नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्यास उत्तर देईल. विमानतळ चालवण्यासाठी उद्या कुणीही येईल पण नाव तेच राहील ही शिवसेनेची भूमिका आहे.
वरळीच्या बीडीडी चाळीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन दुसऱ्यांदा होत असल्याचा आरोप विरोधक करतायेत त्याबद्दल काय सांगाल?
विरोधक करत असलेले आरोप तथ्यहीन आहे. कारण आता जे भूमिपूजन करण्यात आलं. त्या प्रकल्पाचा पूर्ण आराखडा, प्लॅन नव्याने तयार करण्यात आला. पोलीस बांधवांना घरं मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र आदित्य ठाकरे यांनी गेल्या दीड वर्षापासून यावर सकारात्मक तोडगा काढला. आधीच्या प्लॅनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तो प्रकल्प पूर्ण व्हायला २०४० पर्यंत वाट पाहावी लागली असती. मात्र आदित्य ठाकरे यांनी जो प्रकल्प तयार केला आहे. त्यात येत्या ३-४ वर्षात वरळीतील बीडीडी चाळीतील लोकांना घरं मिळतील. त्यामुळे ज्या दिवशी भूमिपूजन होतं तेव्हा आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोटो स्थानिक देवळात लावल्याचं दिसून आलं होतं. आधीच्या प्रकल्पात घरं मिळण्यासाठी २०-२५ वाट पाहावी लागली असती परंतु आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने नव्या प्रकल्पात त्यांना ३-४ वर्षात घरं मिळतील हा विश्वास बीडीडीतील रहिवाशांना आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष न दिलेलं बरं आहे.