शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या छाप्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलेले आहे. यावर कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी बेईमानी करून आलेले सरकार पडले की आम्ही पर्याय देऊ, असे आव्हान देत मनसे युतीबाबतही भूमिका मांडली आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे,' असं फडणवीस म्हणाले. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले आहे. राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांचा मुलगा ईडीच्या ताब्यातशिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंगला घेऊन ईडीचे अधिकारी वसंत लॉन्समध्ये पोहोचले आहेत. ईडीच्या पथकाची शोधमोहीम सुरू असून सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.