नारायण बडगुजर
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघात यंदा पिंपरीचा मतदानातील टक्का वाढला. पिंपरी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत ५४.४६ टक्के मतदान झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही आकडेवारी ४८.७२ टक्के होती. यंदा ५.७४ टक्के जास्त मतदान झाले. या मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ३६८३७१ मतदार होते. या वेळी त्यात वाढ होणे अपेक्षित होते़ मात्र तसे न होता त्यात २०६१३ मतदारांची घट झाली. यंदा ३४७७५८ मतदार आहेत. नवमतदारांची मतदार यादीत नोंदणी करण्यात आली असली तरी दुबार, मयत आणि स्थलांतरितांची नावे वगळण्यात आल्याने मतदारांच्या संख्येत घट झाली. असे असले तरी यंदा मतदानाचा टक्का वाढला. हे मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पिंपरीत शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष यांनाही मतदारांचा कौल दिसून आला.
सकाळच्या टप्प्यात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. पहिल्या दोन तासांत २३८८२ म्हणजे ६.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. दुसºया टप्प्यात नऊ ते ११ दरम्यान ३७६०७ म्हणजे १०.८१ तर तिसºया टप्प्यात ११ ते एकच्या दरम्यान ४०९२८ म्हणजे ११.१७ टक्के मतदारांनी मतदान केले. मात्र दुपारी मतदानात घट झाली. एक ते तीनच्या दरम्यान २९१९६ म्हणजे ८.३९ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढला. तीन ते पाचच्या दरम्यान ३३८२४ म्हणजे ९.७२ टक्के मतदान केले. पाच वाजतानंतर २३९६७ मतदारांनी मतदान केले. ६.८९ टक्क्यांवर ती आकडेवारी गेली. शेवटच्या एका तासातील ही आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. दोन तासांच्या सरासरीनुसार सर्वांत जास्त मतदान या एका तासात झाल्याचे दिसून येते.
राखीव मतदारसंघ असल्याने उत्सुकता पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती - जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघात दलित मतांचा आकडा जास्त आहे. यासह मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारही मोठ्या संख्येने आहेत. झोपडपट्टीबहुल असलेल्या या मतदारसंघात प्राधिकरण, अजमेरा, वल्लभनगर, संत तुकारामनगर आदी विकसित भागही आहे. त्यामुळे संमिश्र असलेल्या या मतदारसंघातील मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल, याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.
२०१४च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीएकूण मतदार : ३ लाख ६८ हजार ३७१झालेले मतदान : १ लाख ७९ हजार ४६१एकूण टक्केवारी : ४८.७२ टक्के
२०१९च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीएकूण मतदार : ३ लाख ४७ हजार ७५८झालेले मतदान : १ लाख ८९ हजार ४०४एकूण टक्केवारी : ५४.४६ टक्के
गेल्या दोन निवडणुकांत पिंपरी मतदार संघातून शिवसेनेलाच मताधिक्य राहिले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेले काम तसेच विकासकामे केल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनाच मतदारांचा कौल मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मत विभागणी होईल. त्यामुळे सायंकाळी झालेल्या मतदानाचा फायदा राष्ट्रवादीला होणार नाही. महायुतीचाच विजय होईल. - गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी मतदारसंघ
अजित पवार यांच्यावर प्रेम असलेले व भाजपातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी काम करीत होते. तसेच सर्व गट-तट एकत्र आणण्यात आम्हाला यश आले. त्याचा फायदा महाआघाडीला होईल. तसेच शिवसेना, भाजपाने दलित व मुस्लिम मतदारांना दुखावले आहे. त्यामुळे ते मतदारांचाही महाआघाडीलाच कौल मिळेल. परिणामी वंचित बहुजन आघाडी किंवा बसपाचा फटका आम्हाला बसणार नाही. पिंपरीत राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. त्यामुळे पार्थ पवार निश्चितच विजयी होतील. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी-चिंचवड