नवी दिल्ली: सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी राफेल डीलची चौकशी केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी दिली. याचा समावेश काँग्रेसनं जाहीरनाम्यात केल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराची चौकशी सुरू करू. याचा समावेश आम्ही जाहीरनाम्यात केलेला आहे, असं मुणगेकर यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी थोड्याच वेळात नवी दिल्लीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यामध्ये अनेक लोकानुनयी घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू होईल. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकी काय काय आश्वासनं देण्यात आली आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशीपासून राफेल व्यवहाराची चौकशी करणार- काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 12:23 PM