Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:15 AM2024-09-25T11:15:17+5:302024-09-25T11:21:30+5:30
बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी निवडणूक होणार, असे अंदाज मांडले जात आहे. त्याबद्दल पहिल्यांदाच अजित पवारांनी भाष्य केले.
Baramati Vidhan Sabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरली होती. मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे बारामती विधानसभा मतदारसंघात वाहू लागले असून, जय पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवारांऐवजी जय पवार बारामतीत लढू शकतात, असे म्हटले जात आहे. जय पवारांना तिकीट दिले जाणार का, याबद्दल पहिल्यांदाच अजित पवारांनी म्हणणे मांडले. (Will Jay Pawar contest Maharashtra Assembly election from baramati constituency?)
बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. युगेंद्र पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. दुसरीकडे, जय पवारांचे बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. जय पवारांकडून मतदारसंघात सुरू असलेल्या गाठीभेटीमुळे ते उमेदवार असणार, या चर्चेला तोंड फुटले.
जय पवार निवडणूक लढवणार? अजित पवार काय म्हणाले?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जय पवार यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 'जय पवारांना उमेदवारी देण्याची मागणी होतेय, चर्चाही आहे, त्याबद्दल काही ठरवलं आहे का?' असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
अजित पवार म्हणाले, "मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकारी आहे. पार्लमेंटरी बोर्ड त्याबद्दलचा निर्णय घेणार. निवडणुका आल्या की काही नवीन लोकांना वाटतं आपण आता आपल्याला तरुण म्हणून संधी द्यावी. काही मधल्या वयातील असतात, 'आम्हाला आता अनुभव आला दोन-तीन टर्मचा म्हणून संधी द्यावी.' ज्यांना पाच-सात टर्मचा अनुभव असतो, आम्ही त्यात परिपक्व झालोय म्हणून संधी द्यावी म्हणतात."
"तिन्ही स्वरूपाचे आले ना की, तिन्हीमध्ये बघायचं की तिथल्या मतदारांना काय पाहिजे? साधारण आता अंदाज येतो. मतदारांना जे पाहिजे, ते देऊन मोकळे व्हायचे. जय पवारांना तिकीट द्यायचं की नाही, त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल", असे अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांना धक्का
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात धक्का बसला. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना जास्त मतदान झाले, तर सुनेत्रा पवार यांना कमी मतदान झाले. या मतदारसंघाचे अजित पवार आमदार आहेत. बारामतीत मतदारसंघातून कमी मतदान झाल्याबद्दलची नाराजी अजित पवारांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे.