मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात पक्षांतराची चर्चा सुरु आहे. यात निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक आहेत असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. त्यानंतर भाजपातला कोणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला होता. सत्ता येईल या अपेक्षेने अनेकजण शिवसेना-भाजपात गेले होते. यामधील अहमदनगर जिल्ह्यातील नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांचाही समावेश आहे. भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार अशा चर्चेबाबत पत्रकारांनी वैभव पिचड यांना प्रश्न विचारला होता.
यावेळी वैभव पिचड म्हणाले की, माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झाला नाही. मी सध्यातरी दिल्या घरी सुखी आहे असं सूचक विधान केले आहे, तसेच अनेक वृत्तवाहिन्यांनी मी राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे असा फोटो दाखवला. याबाबत मी खुलासादेखील केला आहे. सध्या माझ्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही असं मत मांडले आहे. मात्र या वक्तव्यातून भविष्यात काय होईल याचीच चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरु आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसेच यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले नेते-
उदयनराजे भोसले - सातारा
शिवेंद्रराजे भोसले - सातारा
राणजगजितसिंह पाटील - उस्मानाबाद
धनंजय महाडिक - कोल्हापूर
बबनराव पाचपुते - श्रीगोंदा
रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस
मधुकर पिचड-वैभव पिचड - अकोले
गणेश नाईक कुटुंब - नवी मुंबई