कोरोना संकटात देशात काही राज्यांत झालेल्या निवडणुकीनंतर आता राजकारणातही मोठ्या फेरबदलांनी वेग घेतला आहे. भविष्यात होऊ घातलेल्या काही राज्यांच्या निवडणुका (Assembly Elections), राष्ट्रपती निवडणूक (President Election) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरून मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. निवडणूक चाणक्य प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेली भेट या साऱ्या हालचालींचाच एक महत्वाचा भाग आहे. (Prashant Kishore meet Rahul Gandhi to promote NCP leader Sharad Pawar for President Election before Loksabha Election.)
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या यशानंतर प्रशांत किशोर विरोधकांना एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत प्रशांत यांनी काही काळात तीन वेळा भेट घेऊन चर्चा केल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पवारांना भेटून प्रशांत किशोर लगेचच राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना भेटल्याने देशाच्या राजकारणात शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे पुढील वर्षभरात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यासाठी प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे नाव पुढे केल्याचे आज तकने म्हटले आहे. (Is Prashant Kishor lobbying for Sharad Pawar as next President to corner BJP?)
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश?, राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
प्रशांत किशोर यांच्या राजकीय गणितानुसार जर विरोधक एकत्र आले तर इलेक्टोरल कॉलेजच्या (Electoral college) बाबत मोदी सरकारविरोधात मोठी ताकद निर्माण होईल. या विरोधकांसोबत जर बीजेडीचे नवीन पटनायक आले तर हे लक्ष्य आणखी सोपे होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता आहे. यामुळे इथे जास्त मते मिळण्याचा अंदाज आहे. केवळ ओडिशा असे राज्य आहे जिथे पटनायक विरोधकांच्या पारड्यात आलेले नाहीत. सुत्रांनुसार प्रशांत किशोर यांनी पटनायक आणि एमके स्टॅलिन यांच्याशी यावर चर्चा केली आहे.
गांधींसोबत दोन तास चर्चा...प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकत्र येण्याचे फायदे सांगितले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रपती निवडणूक आहे. अशावेळी विरोधक एकत्र आले तर भाजपाचा प्लॅन फसू शकतो, आणि ते लोकसभेला फायद्याचे ठरू शकते, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. प्रशांत किशोर यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. यामुळे या विरोधकांच्या आघाडीसाठी त्यांना अडचणी येणार नाहीत. मात्र, काँग्रेसही सोबत येणे गरजेचे आहे. कांग्रेसची देशभरातील परिस्थिती आणि राजकीय जुळवाजुळव याचे प्रेझेंटेशन प्रशांत किशोर यांनी केल्याचे समजते.
महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा पवार विरोधकांचे नेते होतील अशा चर्चा झाल्या होत्या. देशात विरोधकांना एका नेतृत्वाची गरज आहे. ते शरद पवारांकडे देण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याची चर्चा झाली होती. परंतू आता वेगळीच चर्चा होऊ लागली आहे.