पुणे : शिवबंधन तोंडून हातात घड्याळ बांधणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचा मार्ग शिरूर मतदारसंघाचा मार्ग अतिशय कठीण असणार आहे. विजयाची हॅट्रिक साधणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे त्यांना कडवे आव्हान असणार आहे.
तब्बल सहा विधासभा मतदारसंघ एकत्र करून बसलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ जवळपास ८० टक्के ग्रामीण भाग असलेला आहे. त्यात आढळराव यांचा जनसंपर्क आणि ज्येष्ठत्व यामुळे प्रभावही आहे. अशावेळी त्यांच्यापेक्षा राजकारणात नवे आणि राष्ट्रवादीतही नवे असलेल्या कोल्हे यांना अवघड जाऊ शकते. मात्र शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस वगळता कोणत्याही राजकीय पक्षाचे प्राबल्य इथे नाही. मागील दोनही लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वगळता कोणताही पक्ष आढळराव पाटील यांना तुल्यबळ लढत देऊ शकला नाही.
दुसरीकडे कोल्हे हे मूळ नारायणगाव जवळचे आहेत. शिवाय उत्तम वक्तृत्व कला आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व यांचा फायदा तर त्यांना होणारच आहे. तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता असून त्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादीतून त्यांना होणारी स्थानिक मदतही अशावेळी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कोल्हे यांचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. त्यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाने पुण्यातील शिवसेना गोटातून अजून तरी फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी कामाच्या ताणामुळे ते फारसे फिरकत नसल्याचे कार्यकर्ते कायमच सांगत होते. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशाचा पुणे शिवसेनेवर फारसा परिणाम होईल असे चित्र नाही. त्यामुळे त्यांची वाटचाल आणि बदलते राजकीय चित्र बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.