मुंबई – घोटाळ्याच्या प्रकरणावरून कित्येक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका पत्रानं राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत आघाडी करावी अशी मागणी केली आहे. इतकचं नाही तर प्रताप सरनाईक यांनी पत्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीवरही गंभीर आरोप लावले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम केले जातंय असं त्यांनी म्हटलं होतं.(BJP Devendra Fadnavis Reaction on Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray over Demand of Shivsena BJP Alliance)
दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, भाजपासोबत युती करावी ही प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे अनेकांची इच्छा आहे. परंतु हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सध्यातरी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. विधानसभा निकालात आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्या परंतु बहुमत नव्हतं. मात्र आगामी काळात आम्ही बहुमतानं निवडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपा स्वबळावरच लढत आहे. त्यामुळे कुणी जोडे मारावे आणि कुणाला हार घालावे हे त्यांनी ठरवावं. आमची बांधिलकी जनतेशी आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.
प्रताप सरनाईक यांनी पत्रात काय म्हटलं?
'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे. 'भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं. आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. काही चुकले असल्यास दिलगिरी,' असं सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
सध्याच्या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर यास्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असं माझं वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
राज्यात आपली सत्ता असतानासुद्धा राज्य शासनाचे आणि इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना, कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं हे प्रताप सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.