अमरावती : सरकारी कामात अडथळा आणि पोलिसाला मारहाणप्रकरणी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १०,१०५ रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश उर्मिला फडके (जोशी) यांनी गुरुवारी सुनावली. दंडाचा भरणा केल्याने न्यायालयाने ठाकूर यांना जामीन मंजूर केला. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे मंत्री ठाकूर यांनी सांगितले.
आठ वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. अमरावती येथील गांधी चौक ते चुनाभट्टी या एकेरी वाहतुकीच्या मार्गावरून वाहन नेल्यामुळे उल्हास रवराळे या वाहतूक पोलिसाने यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखले. त्यावेळी यशोमती यांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची तक्रार रवराळे यांनी २४ मार्च २०१२ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात केली. धक्काबुक्कीसाठीचे भादंविचे ३२३ हे कलमही ठाकूर यांच्याविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी दाखल केले होते. न्यायालयाने मात्र मारहाणीचे कलम रद्द करून शासकीय कामकाजात अडथळा (भा.द. वि. कलम ३५३), शासकीय कर्मचाऱ्यास इजा पोहोचविणे (कलम ३३२) आणि १८६ कलमान्वये खटला चालविला. या प्रकरणात सरकारी पक्षाने पाच साक्षीदार तपासले. सहासक सरकारी वकील मिलींद जोशी यांनी सरकारी पक्षाच्यावतीने कामकाज सांभाळले.
न्यायालयीन प्रक्रियेचा मी आदर करते. मी स्वत:च वकील असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेच्या या मुद्यावर अधिक बोलणार नाही. निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. विजय सत्याचाच होईल, अशी मला खात्री आहे.- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री