केरळमधून लोकसभेवर जाणाऱ्या महिला अत्यल्पच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:11 AM2019-03-08T06:11:44+5:302019-03-08T06:11:59+5:30
केरळमधील काही समाजांमध्ये अनेक वर्षे मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे आजही तेथे महिलांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो.
कोची : केरळमधील काही समाजांमध्ये अनेक वर्षे मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे आजही तेथे महिलांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो. रोजगारासाठी देशच्या अन्य भागांत वा परदेशात जाणाऱ्यांमध्ये केरळमधील महिलांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आजवर अस्तित्वात आलेल्या १६ पैैकी ६ लोकसभांमध्ये केरळमधून एकही महिला खासदार निवडून गेलेली नाही. १९५१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये अॅनी मस्करेन या एकमेव अपक्ष महिला खासदार होत्या. येत्या निवडणुकांमध्येही येथून लक्षणीय संख्येने महिला खासदार निवडून येण्याची शक्यता नाही.
२००९ ते २०१४ या कालावधीसाठी अस्तित्वात आलेल्या १५ व्या लोकसभेत केरळमधील सर्व २० जागांवर पुरुष खासदार निवडून गेले होते. त्या तुलनेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) खासदार सुशीला गोपालन यांना मिळालेले यश लक्षणीय आहे. त्या तब्बल तीनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. राज्यातील ज्येष्ठ माकप नेते ए. के. गोपालन यांच्या पत्नी असलेल्या सुशीला यांनी अलपुझ्झा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना निवडणुकांत दोनदा धुळ चारली होती.
केरळमधून आजवर १२ वेळा महिला खासदार निवडून आल्या. त्यातील नऊ जणी डाव्या पक्षांच्या उमेदवार होत्या. काँग्रेसच्या एकमेव महिला खासदार सावित्री लक्ष्मणन या १९८९ व १९९१ साली मुकुंदपुरम मतदारसंघात लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांत दोनदा विजयी ठरल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>एकच महिला खासदार
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत केरळमधून पी. के. श्रीमती या एकमेव महिला खासदार निवडून आल्या. कन्नूर मतदारसंघातून माकपतर्फे त्या रिंगणात होत्या. या निवडणुकांत २६९ महिलानी आपले नशीब अजमावले होते. त्यापैैकी फक्त सहा जणींनी प्रमुख राजकीय पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. २००४ व २००९च्या लोकसभा निवडणुकांत राज्यामध्ये १५ महिला उमेदवारांपैैकी फक्त दोनजणी निवडून आल्या होत्या.