हैदराबाद – राजकीय पक्ष महिलांना तेव्हाच उमेदवारीचं तिकीट देतात जेव्हा त्यांचा पुरुष नेत्याशी संपर्क असतो असं विधान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केलं आहे. मौलाना आजाद नॅशनल उर्दु महाविद्यालयाने महिला शिबिराचं आयोजन केलं होतं, यावेळी निर्णयात महिलांचा सहभाग यावर बोलताना त्या बोलत होत्या. वेबिनारच्या माध्यमातून रेखा शर्मा या आयोजनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी रेखा शर्मा म्हणाल्या की, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील, अशा महिला आहेत ज्यांच्याकडे चांगले मंत्रालय आहे परंतु त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. राजकीय पक्ष महिलांना तिकीट देऊ इच्छित नाही कारण त्यांना वाटतं ही महिला निवडणूक हरू शकते असंही त्यांनी सांगितले.
तसेच अशा व्यक्तींना तिकीट दिलं जातं, ज्यांची प्रतिमा समाजात खराब आहे. अशा व्यक्तींवर आरोप आहेत, पण राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देणार नाहीत. इतकचं नाही तर जर कोणत्या महिलेला तिकीट मिळत असेल तर तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असावा लागतो. म्हणजे महिलेचा चेहरा आणि काम दुसरं कोणी करेल असं राजकारण करणाऱ्यांवर रेखा शर्मा यांनी जोरदार निशाणा साधला.