पुणे : प्रणितीला त्या कार्यक्रमात कोणतेही अपशब्द उच्चारायचे नव्हते. तिच्या तोंडून चुकून ते शब्द निघून गेले. मी असे बोलायला नको होते, असे प्रणिती मला म्हणाली, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी सोलापुरातील मौलाली चौकातील रस्ते कामाच्या उदघाटन कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्यावर ‘बेवडा खासदार’ अशा शब्दांत टीका केली होती. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना पुण्यातील एका कार्यक्रमात विचारणा केली असता त्यांनी प्रणितीच्या तोंडून चुकून असे उदगार निघाल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले, ‘मी शरद बनसोडे यांच्या माणसालाही याबाबत कळवली आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत, दलित समाजातील आहेत, आमचे आहेत. त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आमची त्यांच्याविषयीची भावना अजिबात वाईट नाही.’