मुंबई - सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरु शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही, आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करु. पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगतांना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अप्रतिम कॉफी टेबल बुक
अतुल्य हिंमत हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम झाले असून मी त्याकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भुमिकेतून पाहात आहे. अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण या कॉफी टेबल बुकमध्ये आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांचे अभिनंदन केले.