पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 01:21 AM2020-12-31T01:21:16+5:302020-12-31T06:51:34+5:30

सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते.

The year that laid the foundation for the next politics | पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

Next

गौरीशंकर घाळे

मुंबई : सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यावर नेहमीच्या राजकारणाला चेव चढला आहे. लाॅकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे झालेले हाल, रोजगाराचा प्रश्न, कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार यासोबतच बाॅलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेना, मेट्रो कारशेड आणि ईडीच्या नोटिसांभोवती यावर्षीचे राजकारण फिरत राहिले.

राज्यात महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग

राज्यात महाविकास आघाडीचा नवा राजकीय प्रयोग सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. वाॅर्ड आणि विभागस्तरावरील नेते, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था आहे. आघाड्यांच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे स्थानिक पातळीवरील नेते सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ याच भूमिकेत आहेत. निवडणुका एकत्र लढण्याची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असली तरी काँग्रेसने भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजप सध्याचे संख्याबळ राखण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. कृष्णकुंजवर शिष्टमंडळांचा राबता वाढला असला तरी त्याचा निकालात लाभ उठविण्यासाठी संघटनेची जोड देण्याचे आव्हान मनसेसमोर कायम आहे.

राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

राज्यात सत्ता येताच राष्ट्रवादीने मुंबईवर लक्ष केंद्रित केले. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पालिका निवडणुकीचे बिगुलही वाजविले गेले. पण, लाॅकडाऊनमुळे त्याला ब्रेक लागला. आता सत्तेच्या माध्यमातून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्र्यांचा जनता दरबार याकामी पूरक ठरेल असा होरा आहे. मुंबई अध्यक्ष  नवाब मलिक यांनी स्थानिक पातळीवर आक्रमकपणे संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पाठीराखे पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मातोश्रीला सत्तेचे कवच

कोरोना काळात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत पालिकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमुळे हिंदुत्व त्यागले नाही, हा संदेश देण्याची एकही संधी वाया जाणार नाही याची खबरदारी शिवसेना नेतृत्वाकडून घेतली जात आहे. जोडीला मराठीचा मुद्दा तेवत ठेवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कंगना रनौत प्रकरण अनावश्यकपणे अंगावर ओढवून घेतल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यावर भर दिला गेला. 

भाजप- जुन्या शिलेदारांचे काय होणार?  

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद आहे.  रस्त्यावरील राजकारणाच्या त्यांच्या मर्यादा लक्षात घेता आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे प्रभारी पद सोपविण्यात आले. विनोद तावडे यांची राष्ट्रीय राजकारणात पाठवणी झाली आहे. तर, मागील पालिका निवडणुका गाजविणारे आशिष शेलार काहीसे बाजूला फेकले गेल्याची चर्चा आहे. शह-काटशह भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. 

Web Title: The year that laid the foundation for the next politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.