येडीयुराप्पांच्या मागे लागलीय सहस्यमयी CD; कर्नाटक भाजपात बंडाचे वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 09:55 AM2021-01-21T09:55:34+5:302021-01-21T09:56:28+5:30
Karnatak Politics : गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त करताय येडीयुराप्पांनी त्यांना दिल्ली हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मात्र, यानंतर भाजपाच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरून गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बंगळूरू : विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली. आता पुन्हा कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त करताय येडीयुराप्पांनी त्यांना दिल्ली हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली त्यांची नावे दिल्लीत ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगतानाच एक मंत्रीपद रिक्त असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, यानंतर भाजपाच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरून गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे नाव आता ब्लॅकमेल जनता पार्टी व्हायला हवे. ज्या आमदारांनी रहस्यमयी सीडीवरून मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल केले त्यांना मंत्रीपदे देण्यात आल्याचा आरोप भाजपाचेच आमदार करत आहेत.
सीडी प्रकरण काय?
कर्नाटकच्या राजकारणात सीडीची एन्ट्री 2017 मध्ये झाली. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या खासगी सहाय्यक एनआर संतोष यांनी ग्राम विकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्या पीए विनय यांच्या कथित अपहरणाचा प्रयत्न केला होता. विनयकडे एक अशी सीडी आहे, ज्याद्वारे मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो. ही सीडी संतोष यांना तोडायची होती. अपहरणाच्या गुन्ह्यात संतोष यांना जामीनदेखील मिळालेला आहे. काही महिन्यांपूर्वी संतोष हे येडीयुराप्पांचे राजकीय पीए बनले आहेत. नोव्हेंबरमध्ये संतोष यांनी कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा पुन्हा एकदा सीडी प्रकाशझोतात आली होती. यावर शिवकुमार यांनी सांगितले की, मला सांगण्यात आले की संतोष यांच्या कथित आत्महत्येमागे ती सीडी आहे. तपास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
भाजपाच्य़ा आमदारांचे आरोप
मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचे आमदार बीपी यतनाल यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री येडीयुराप्पांना काही आमदार या सीडीवरून गेल्या तीन महिन्यांपासून ब्लॅकमेल करत आहेत. यापैकी एकाला राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्री बनविण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यानंतर पुन्हा ती सीडी चर्चेत आली आहे.