नवी दिल्ली - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. योगेंद्र यादव यांनी एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना "पंतप्रधान मोदी स्वत: काही दिवसांपूर्वी जनआंदोलनाबाबत बोलत होते. काँग्रेस विरोधात ते जनआंदोलन करण्याची भाषा करत होते. मात्र आता त्यांना आंदोलन खटकत आहे" असं म्हटलं आहे.
"कधी-कधी वाटतं की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचं काय होईल?" असं म्हणत यादव यांनी हल्लाबोल केला आहे. "दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मोदी यांनी आज एक नवा शब्द जन्माला घातला आहे. तो म्हणजे आंदोलनजीवी. पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचं बोलण शोभा देत नाहीत" असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.
"हो मी आंदोलनजीवी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य एका आंदोलनामुळेच मिळालं आहे. या देशाने अनेक मोठमोठी आंदोलनं पाहिली आहेत. त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच परिवर्तन झालं आहे. काँग्रेस काळात पंतप्रधान मोदीच जनआंदोलनाची गोष्ट करत होते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन त्यांच्या पक्षानंही आंदोलनं केली होती" असं देखील योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
आंदोलनजीवी टोळीपासून बचाव करा, नवा FDI म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी; पंतप्रधानांचा निशाणा
आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं.
"18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?"
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला "18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?" असा प्रश्न विचारला आहे. लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्रेटा थनबर्ग वरून निशाणा साधला आहे. "सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींना भरकटवलं जात आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का? की विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याबद्दल 18 वर्षीय मुलीला (ग्रेटा थनबर्ग) आपल्याकडे शत्रू मानलं जात आहे?" असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.