लखनऊ - महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर छेडछाडीचे प्रकार घडले, त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याचे पोस्टर्स संपूर्ण शहरात झळकावण्यात येणार आहेत. यापूर्वीही योगी सरकारने असं पाऊल उचललं होतं.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले जात होते, उत्तर प्रदेशातही सीएएविरोधातील आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरु होते. यावेळी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. सरकारी संपत्तीचं नुकसान झालं. त्यावेळी योगी सरकारने हिंसा करणाऱ्या आणि सरकारी संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांचे पोस्टर्स शहरातील अनेक रस्त्यांवर लावले होते.
मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवतील, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलून दोषींवर कारवाई करावी. त्याचसोबत यात जे गुन्हेगार दोषी आढळतील त्यांचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशात काय म्हटलं आहे?
महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणाऱ्या आरोपींना महिला पोलिसांनी दंड द्यावा
महिला पोलिसांनी अशा गुन्हेगारांना अद्दल घडवावी
तसेच या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या लोकांचीही नावे जाहीर करावीत.
ज्याप्रकारे एन्टी रोमिया स्क्वॉडने छेड काढणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवला तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याने हे अभियान राबवावे.
कुठेही महिलांवर अत्याचार होत असेल तर त्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असेल.
उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योगी सरकारने हे पाऊल उचललं आहे. जे आरोपी असतील त्यांचे पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करण्यात येईल. शहरातील प्रत्येक चौकाचौकात हे पोस्टर्स लावण्यात येतील. या आरोपींबद्दल संपूर्ण शहराला माहिती दिली जाईल, त्यामुळे यांच्यावर सामुहिक बहिष्कार टाकला जाईल, तसेच या आरोपींना मदत करणाऱ्यांवर दहशत राहील असा प्लॅन योगी सरकारने बनवला आहे.