मुंबई : लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झाल्यानंतर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर केला. सुटकेनंतर राणे नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी, माझी मुले मुंबईबाहेर असताना जुहूतील माझ्या घरासमोर जे लोक आले त्यांची माहिती तर मी घेतोच आहे. तुम्हालाही घर, मुलंबाळं नाहीत का? हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला. राणेंच्या बंगल्यासमोर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. तुम्हाला सर्वांनाच मी पुरून उरलो आहे. शिवसेनेला निपटण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.
त्यावेळी मी शिवसेना वाढविली, तेव्हा हे आजचे अगदी अपशब्द वगैरे बोलणारेही कोणीच नव्हते, असे राणे यांनी सुनावले. शिवसेनेच्या काही आमदारांनी राणेंचा कोथळा बाहेर काढू, आदी धमक्या दिल्या आहेत, यावर राणे म्हणाले की, आयुष्यात उंदीर नाही मारला ते काय करणार? कोथळा कसा असतो हे त्यांना दाखवावे लागेल. महाविकास आघाडी सरकार काही दिवसांचे पाहुणे असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.मी बोलणारच, टीकाही करणारहायकोर्टाने आज आपल्याला दिलासा दिला, याचा अर्थ देशात कायद्याचे राज्य आहे हे दिसतेच. भाजप माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. प्रकरण कोर्टात असल्याने मी १७ सप्टेंबरपर्यंत फार बोलणार नाही. जन आशीर्वाद यात्रेत मी बोलणारच, टीकाही करणारच. मी कोर्टाला कोणतीही हमी दिलेली नाही, असे ते म्हणाले.सत्कार कशाचा करताय? राणेंच्या बंगल्यासमोर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला, यावर राणे म्हणाले की, सीमेवर जाऊन पराक्रम केला काय? १२ जण हॉस्पिटलमध्ये आहेत अन् सत्कार कशाचा करताय? पुन्हा बंगल्यासमोर येऊन दाखवा.
राग यावा, असे मी काय बोललो? मी उद्धव ठाकरेंबद्दल काहीही वाईट बोललो नाही. देशाचा अमृत महोत्सव असताना हीरक महोत्सव म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी देशाबद्दल अज्ञान दाखवलं, म्हणून मी बोललो. मुख्यमंत्र्यांना राग यावा, असे मी काय बोललो? पण हेच मुख्यमंत्री आधी काय बोलले? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘चपला घ्याव्यात आणि बडवावं’, असे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत त्यांनी निर्लज्ज हा शब्द विधानसभेत वापरला. शिवसेना भवनबद्दल कोणी काही बोलत असेल तर त्याचे थोबाड फोडा, हेही मुख्यमंत्री असताना बोलले, याकडे राणे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
दिशा सालियन, पूजा चव्हाण यांचाही उल्लेखदिशा सालियनच्या वेळी कोण मंत्री उपस्थित होता, त्याचा छडा लागत नाही. पूजा चव्हाणचेही तेच. आता काहीही होऊ द्या, आम्ही गप्प बसणार नाही. त्या मंत्र्यांना अटक होईपर्यंत कायदेशीर लढाई लढणार, असे राणे म्हणाले.
शरद पवार यांनाही चिमटाराणे यांनी यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केले. ‘पवारसाहेब, काय सज्जन, सालस माणसाला आपण मुख्यमंत्री केलंय’, असा चिमटा त्यांनी काढला. आपल्या अटकेसंदर्भात अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याची व्हिडीओ क्लिप आहे, आपण त्याविरुद्ध कोर्टात जाऊ, असे ते म्हणाले. त्यांना गृहखात्याचे अधिकार कोणी दिले? कलेक्शनचे आणि इतर अधिकार तर आधीच वर्ग केलेले आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांविरोधात पाेलिसांत तक्रारी- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. - याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी तक्रार भाजपने यवतमाळ जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांत दिली. अमरावती व नाशिकमध्येही मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.