“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

By प्रविण मरगळे | Published: January 18, 2021 12:08 PM2021-01-18T12:08:19+5:302021-01-18T12:12:06+5:30

अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान अजितदादांना दिलं आहे.

Your political stature is not that high Nilesh Rane Target DCM Ajit Pawar again | “अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

googlenewsNext
ठळक मुद्देती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाहीअजित पवारांच्या  विधानावर माजी खासदार निलेश राणेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.अजित पवार आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगणार

मुंबई – माजी खासदार निलेश राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं आहेत, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता, जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असं त्यांनी म्हटलं होतं, त्यावर निलेश राणेंच्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला होता.

निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, त्यावरून निलेश राणेंनी अजितदादांवर पलटवार केला होता. फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर आता अजित पवारांच्या  विधानावर माजी खासदार निलेश राणेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं  मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले होते.

त्यावर निलेश राणे म्हणाले आहेत की, अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही. इतक्या वर्षात त्या गावांना भेट देण्याकरिता कधी गेलात का? अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान राणेंनी अजितदादांना दिलं आहे. त्यामुळे निलेश राणेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं गरजेचे आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, वर्ष १९५६ मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद, तर अडिचशेहून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही अजित पवारांनी व्यक्त केला.

Web Title: Your political stature is not that high Nilesh Rane Target DCM Ajit Pawar again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.