महाविकास आघाडीत शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 08:58 AM2020-12-04T08:58:56+5:302020-12-04T09:04:08+5:30
Vidhan Parishad Election Results: विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अद्याप दोन जागांचे निकाल लागायचे आहेत.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. एकट्या भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. परंतू शिवसेनेचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे.
सहापैकी चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नागपूर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
शिवसेना अमरावतीत चितपट?
विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेला अपक्ष उमेदवाराने तगडी लढत दिली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत. निकाल अद्याप लागलेला नाही. काही वेळातच निकाल लागण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांचा विजय होताच भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. पटेल यांनी ३३२ मते मिळवीत विजयाची हॅट् ट्रिक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली.