लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यासाठी ‘कोविशिल्ड’ लसीचे १ लाख १० हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत. पुणे शहरासाठी ६० हजार, पिंपरी-चिंचवडसाठी १५ हजार तर पुणे ग्रामीणसाठी ३६ हजार लसींचे डोस वितरित करणार आहेत. जिल्ह्यामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुणे जिल्ह्यात ५५ लसीकरण केंद्रे असतील, त्यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी १६ तर पुणे ग्रामीणमध्ये २३ ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांतर्गत असलेले कर्मचारी, त्यानंतर पोलीस विभाग, सैन्य दल आणि हवाई दलातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना, तर तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचणार आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख १० हजार इतकी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दोन डोस म्हणजेच २ लाख २० हजार डोसची गरज भासणार आहे. सध्या सुमारे ९५ हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक, आरोग्य सहायक यांचे तालुका स्तरावर लसीकरणासाठी प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
--
शीत साखळी उपकरणे
शीतसाखळी केंद्र आइस लाइन रेफ्रिजरेटर डीप फ्रीजर अपेक्षित लस मागणी
पुणे ग्रामीण १२८ २०० १४६ ८७,५७९
पुणे मनपा ५५ ७० ५१ ९५,०४३
पिंपरी-चिंचवड मनपा ३५ ५२ ३९ ४०,४५५
एकूण २१८ ३२२ २३६ २,२३,०७७
---
लसीकरणासाठी नियोजन
लसीकरण केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष अशा तीन खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा कक्षामध्ये लाभार्थ्यांची यादी असेल. यादीतील नाव तपासून प्रतीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. लसीकरण कक्षामध्ये प्रत्यक्ष लस टोचली जाईल. त्यानंतर, निरीक्षण कक्षामध्ये लस टोचल्यानंतर ३० मिनिटे या रूममध्ये बसविण्यात येईल. लसीकरणानंतर होणारे विपरित परिणाम घडल्यास एईएफआय किटची व्यवस्था केली आहे.