पुणे/सासवड - वन खात्यातील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुरंदर तालुक्यातील सासवडसह इतर १८ गावांतील ३८ जणांची सुमारे १ कोटी २६ लाख रुपये रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे प्रकरण सासवडमधील एका युवकाच्या फिर्यादीनंतर उघडकीस आले असून ,सासवड पोलीस ठाण्यात फसवणुक झालेले सारेजण हजर झाले आणि सात जणांच्या टोळीपैकी पाचजणांना अटकही झाली आहे. अविनाश चंद्रकांत भोसले (रा, सासवड, ता. पुरंदर) असे यातील मुख्य फिर्यादीचे नाव आहे. या फिर्यादीचे ३ लाख ८० हजार रुपये या टोळीने वन खात्यातील नोकरीसाठी घेतले. तर बाकी ३७ जणांकडून कमी अधिक पैसे घेतले व फसवणुक केली. फिर्यादी अविनाश भोसले यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली नसती तर अजून काही दिवसांत फसवणुक होणारांचा आकडा वाढला असता, असे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केले.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - १) नामदेव मारूती मोरे, (वय ५७, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे) २) सुजाता महेश पवार, (वय ३३, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. १२. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे) ३) हरीचंद्र महादेव जाधव, (वय ३२, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे) ४) नरेश बाबूराव अवचरे (वय ३८ , रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे), ५) राजेश बाबूराव पाटील (वय ६० रा. एस.आर.पी.कॅम्प ७ शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे) ६) संतोश राजाराम जमदाडे (वय ३४ ,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे) ७) अजित गुलाब चव्हाण (वय ६७, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे). या सर्व सातही आरोपींनी वरील लोकांकडून एकूण रूपये १,२६,००,००० रुपये (एक कोटी सव्वीस लाख) एवढी रक्कम घेवून वन खात्यामध्ये नोकरीस लावतो., असे सांगून फसविले. त्यासाठी त्यानी बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, शिक्का, खाकी गणवेश असे विविध साहीत्य वापरून रोख स्वरूपात तसेच बॅक खात्यावर रक्कम घेवून लोकांचा विश्वास घात करून त्याची फसवणूक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व तपास अधिकारी विनय झिंजुरके यांनी सांगितले.
जानेवारी २०२१ ते १२ मे २०२२ या दरम्यान ही अनेकांची फसवणुक झाली आहे. या सातजणांच्या टोळीने सासवड सह जेजुरी, वीर, पुणे, पिंपरी चिंचवड, आदी ठिकाणी विविध नोकरी इच्छुक तरुणांची बेमालुम फसवणुक केली. नकली जाॅईनिंग लेटर, अोळखपत्र, बोगस ड्रेसकोड देऊन व त्यात इतर तरुणांचे फोटो दाखवून ही नोकरी इच्छुक तरुणांची बेमालुम फसवणुक केली. आरोपींपैकी नामदेव मारूती मोरे आणि राजेश बाबूराव पाटील हे दोघे फरारी असून बाकी पाच आरोपींना सासवड पोलीसांनी अटक केल्याचे विनय झिंजुरके यांनी सांगितले.