पुणे : प्लॉटिंगच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून विक्री केलेल्या प्लॉटमधून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विश्वविनायक डेव्हलपर्सच्या हांडेवाडी येथील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत युवराज बाळासाहेब घावटे (३५, रा. गणेश निवास, भवानी पेठ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून उत्तम दामोदर शेवाळे, गौतम शेवाळे, अंकुश शेवाळे, वैभव शेवाळे, सुजाता शेवाळे, गौरत शेवाळे, केतकी शेवाळे आणि माधुरी शेवाळे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या जागेत प्लॉटिंग करण्याबाबतचा समजुतीचा करार दाखवून ६७ प्लॉट पडणार असल्याचे फिर्यादी घावटे यांना सांगितले. एक प्लॉट १० लाख ७५ हजार रुपयांना विकणार असून, या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफा देण्याचे आमिष घावटे यांना दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांना प्लॉटिंगच्या व्यवसायात ४० लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. घावटे यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवले. यानंतर घावटे यांना २० लाख रुपये परत केले. उर्वरित रकमेवर प्रति गुंठ्याप्रमाणे व व्याज असे मिळून १ कोटी ६४ लाख ७ हजार ५०० रुपये आरोपींनी घावटेंना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीची जमीन उल्हास शेवाळे याला परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घावटे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.