पुणे : एल अँड टी कंपनीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून प्रोजेक्ट डायरेक्टरने १ कोटी ३४ लाख ७८ हजार १६४ रुपयांची फसवणूक केली. जनरल स्ट्रक्चरल मॅनेजरने चढ्या दराने देयक मंजूर करून कंपनीची ४७ लाख ९ हजार ५६१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल सुबीर बॅनर्जी (४६, रा. ठाणे) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रोजेक्ट डायरेक्टर विजयकुमार माथनकुमार (रा. खराडी), स्ट्रक्चरल मॅनेजर बसवराज चन्नागी या दोघांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ पर्यंतच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅनर्जी हे एल अँड टी कंपनीचे जनरल सिक्युरिटी मॅनेजर आहेत. एल अँड टी कंपनीने कन्स्ट्रक्शन कामासाठी लागणारे साहित्य हे भाडेतत्त्वावर घेतले होते. विजयकुमार माथनकुमार यास हे माहीत असतानादेखील त्याने पदाचा गैरवापर करून भाडेतत्त्वार घेतलेल्या साहित्याची इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विल्हेवाट लावून कंपनीचे १ कोटी ३४ लाख ७८ हजार १६४ रुपयांचे नुकसान केले, तसेच कमिशन घेऊन व्हेंडर, सबकॉन्ट्रॅक्टरची बिले चुकीच्या पद्धतीने मंजूर करून कंपनीचे नुकसान केले आहे.
तर बसवराज चन्नागी हा कंपनीत स्ट्रक्चरल मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कंपनी आणि व्हेंडर, सबकॉन्ट्रॅक्टर यांच्यामधील दुवा एजंट होता. बसवराज चन्नागिने साइटवर कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे काम न करता स्वतःच्या फायद्यासाठी ओरिएंटल रेल इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. व टेक्नोक्रॅफ्ट इंडस्ट्री या रजिस्टर व्हेंडरच्या वर्क ऑर्डरला मंजुरी देऊन त्यांना चढ्या दराने देयक मंजूर करून त्या बदल्यात त्याने कमिशन म्हणून पत्नीच्या फर्मच्या बँक खात्यावर ४७ लाख ९ हजार ५६१ रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील हे करत आहेत.