पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे पोलीस असल्याचे भासवून एसटी मधील चार प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.
निलंगा - भिवंडी या एसटी मधून कुरियर सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव ( वाघोशी, ता. फलटण ) विकास बोबडे, तेजस बोबडे, संतोष बोबडे (तिघे रा. फलटण , जि. सातारा ) हे चौघे प्रवास करत होते. त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख आणि मेटल होते.
एसटी पाटस येथील ढमालेवस्ती परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास आली असता या एसटीला चौघांनी अडवलं. त्यांच्या हातात काठ्या, खाकी पँट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे निदर्शनास आल्याने याप्रसंगी बस थांबवली असता कंडक्टरने दरवाजा ऊघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलीस तोऱ्यात शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहे असे म्हणाले. तेव्हा बसमध्ये पाठीमागे बसलेले चौघे उठले.तेव्हा त्यांच्या शर्टच्या कॉलर पकडत त्यांना एसटीमधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगितले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करत त्यांच्याकडील रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि दोन दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून गेले.