माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती
लाखेवाडी : शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ च्या हंगामात इथेनॉलचे १ कोटी ८ लाख लि.चे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. तसेच, कारखान्याचा प्रतिदिनी १ लाख लि. उत्पादन क्षमतेचा इथेनॉलचा नवीन प्रकल्प पुढील वर्षीच्या इथेनॉल हंगामापासून कार्यान्वित होईल. त्यामुळे कारखान्याची इथेनॉलची उत्पादन क्षमता प्रतिदिनी २ लाख लि. एवढी होणार आहेत. दरम्यान, चालू होणाऱ्या हंगामामध्ये कारखान्याने १ कोटी ७५ लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दिली.
शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या इथेनॉल हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इथेनॉलच्या पूजनाने करण्यात आली. सदरप्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा हंगाम १७ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झाला. त्यानंतर २०७ दिवस इथेनॉलचा हंगाम चालला. या हंगामामध्ये दैनिक ५२ हजार लि. क्षमतेने प्रकल्पाच्या १२० टक्के कार्यक्षमतेचा वापर करीत १ कोटी ८ लाख लि. इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले व तेल कंपन्यांना कराराप्रमाणे पुरवठा करण्यात आला आहे. तसेच हंगामात रेक्टिफाईड स्पिरिटचे १ कोटी १८ लाख लि. उत्पादन घेऊन त्यापैकी ३.१८ लाख लि. विक्री करण्यात येऊन उर्वरित रेक्टिफाईड स्पिरिटचा इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आला आहे. सध्या राज्यातील साखर उद्योग काहीसा अडचणीत असला, तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी इथेनॉलचे दीर्घकालीन असे धोरण जाहीर केल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार प्राप्त झाला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले. या कार्यक्रमामध्ये इथेनॉलचा हंगाम यशस्वीरीत्या पार पडलेबद्दल इथेनॉल प्रकल्पाचे इन्चार्ज सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी, कर्मचारी यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, कमाल जमादार उपस्थित होते. तत्पूर्वी संचालक भागवत गोरे व सुनीता गोरे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे, तर आभार सुधीर गेंगे-पाटील यांनी मानले.
फोटो ओळी : शहाजीनगर येथे नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉल हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व इतर.
१७०८२०२१-बारामती-०९