पुणे : शेतकऱ्याला चारचाकी गाडीत डांबून ठेवत, दमदाटी करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवित शिवाजीराव भोसले बँकेतील अधिकाऱ्याशी संगनमत करून शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीचे गहाणखत करून ६ कोटी ७५ लाख रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी शेतकऱ्याकडेच १ कोटी रुपयाची मागणी केल्याप्रकरणी मंगलदास बांदलला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगलदास विठ्ठल बांदल (वय ४५ रा. मु.पो. शिक्रापूर, ता. हवेली) याच्यासह पाच जणांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील संदीप उर्फ आप्पा उत्तमराव भोंडवे (वय ४७, लोणीकंद), विकास दामोदर भोंडवे (वय ४३,रा. वढू खुर्द) या दोघांना न्यायालयाने जामीन दिला आहे. आरोपी सचिन पालांडे आणि हनुमंत केमधरे या दोघांचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरोधात एका ७४ वर्षीय शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. वढू खुर्द भागात २०१३ आणि त्यानंतरच्या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपी मंगलदास बांदलसह इतर आरोपींनी रिव्हॉल्वरच्या धाकाने फिर्यादीच्या मालकीची वढू खुर्द भागातील ३ हेक्टर ७१ आर जमिनीचे गहाणखत केले आणि ६ कोटी ७५ लाख रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले. तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच अद्याप बोझा कमी केला नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ ने मंगलदास बांदल यास शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीच्या बनविलेले गहाणखतासंदर्भात कागदपत्रे हस्तगत करणे, तसेच गहाणखत बनवून बँकेकडून घेतलेले ६ कोटी ७५ लाख रुपयांची विल्हेवाट कशी लावली याचा आरोपींकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर जप्त करणे आदी तपास करण्यासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाते ती मान्य केली.
--------------