लोणी काळभोर : प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी न घेता मालवाहू वाहनात अनधिकृतपणे बदल करून, त्याचा डीजे म्हणून वापर केल्याबद्दल सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एका डीजे वाहनमालकाला तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा दंड केला असून वाहन मूळ स्वरूपात आणेपर्यंत वाहनाची नोंदणी रद्द केली आहे. या संदर्भात सतीश अशोक कुंजीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश उंबरदेव करचे यांनी फिर्याद नोंदविली आहे. १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकराला पेठ गाव येथे डीजे चालू असल्याबाबत एक फोन ग्रामीण नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार नियंत्रण कक्षाने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती देऊन खात्री करण्यास सांगितले होते. सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, शंकर साळुंखे, गणेश करचे या पोलीस पथकाने पेठ गावातील अल्ट्रा टेक कंपनीशेजारी जाऊन पाहणी केली असता तेथे डीजेवर बारा स्पिकर सुरू होते. डीजे चालकाला डीजे बंद करण्याची सूचना देऊनही त्याने डीजे बंद न केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधातगुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने सदर वाहनाची तपासणी केली. कागदपत्रे वैधतेबाबत तडजोड शुल्क, कर, फिटनेस सर्टिफिकेट, व्यवसाय कर, विक्री कर असा एकूण एक लाख तीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच मालवाहू वाहन मूळ स्वरूपात आणेपर्यंत सदर वाहनाची नोंदणी रद्द केली आहे.
डीजे मालकाला १ लाख ३० हजारांचा दंड
By admin | Published: April 28, 2017 5:42 AM