पुणे : मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेत आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणींनी अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजात सौनिक यांनी दिले आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट असल्याने महिलांनी आपल्या वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी सुरुवातीला नारीशक्ती या ॲपवरून ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. मात्र, एकाचवेळी अनेकजण अर्ज करत असल्याने सर्व्हर संथगतीने चालत होते. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रांसह लेखी अर्ज करून तो स्वीकारण्यात येत आहे. जिल्ह्यात गुरुवार अखेर १ लाख ७ हजार ६९० जणींनी अर्ज भरले आहेत. त्यात ऑफलाइन अर्जांची संख्या ७५,६६३ तर ऑनलाइन अर्जांची संख्या ३२,०२७ आहे.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निर्देशांनुसार आता योजनेत अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार आहेत. अर्जातील घोषणापत्रावर सही करून तो अर्जाला जोडावा. हा अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शहरातील क्षेत्रीय कार्यालयात जमा करावा. हा अर्ज अपलोड करताना प्रत्येक अर्जदाराला बोलाविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा गडबड न करता शांतपणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. - मोनिका रंधवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी