पुणे : कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांचे 200 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. उबा सव्हियर गोडविन (वय 31, रा़ पिसोळी) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महाडिक, व त्यांचे पथक गस्त होते. कोंढवा येथील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर एक नायजेरियन कोकेन विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. या माहितीनुसार त्यांनी कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर सापळा रचला. तेव्हा एक नायजेरियन तरुण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर त्याच्याकडे 200 ग्रॅम कोकेन, 1 लाख 84 हजार 190 रुपये रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 12 लाख 15 हजार 49 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, महेश कदम, पांडुरंग वांजळे, उदय काळभोर, अमोल पिलाणे, प्रवीण पडवळ, संदीप साबळे, सचिन कोकरे यांनी केली आहे.