लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे काही दिवसांपासून लसींचा साठा कमी भासत असून ज्यादा डोसेसची गरज भासत आहे. लस नसल्याने अनेक केंद्रावरून नागरिकांना लस न घेताच परत जावे लागल्याने अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. यामुळे आणखी लसींची मागणी जिल्ह्याकडून राज्याला करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीणसाठी एक लाख लसींचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले.
कोरोना प्रतिबंध लसीचे प्राप्त झालेल्या एक लाख डोस पैकी ५० हजार डोस हे कोविशिल्डचे तर ५० हजार डोस हे कोव्हॅक्सीनचे मिळाले आहे. या लसींचे वितरण पुणे महानगरपालीका, पिंपरीचिंचवड महानगरपालीका आणि ग्रामीण विभागाला वितरीत करण्यात येणार आहे. या लसींचे तात्काळ वितरण करण्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. कोव्हिशिल्डच्या ५० हजार डोसपैकी पुणे महापालिकेला २० हजार, पिंपरी-चिंचवडला १० हजार तर ग्रामीण भागासाठी २० हजार डोस वितरीत केले जाणार आहे. तर कोव्हॅक्सिनच्या ५० हजार डोसपैकी पुणे महापालिकेला २५ हजार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला १० हजार आणि तर ग्रामीण भागाला १५ हजार लसींचे डोस दिले जाणार आहेत.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग जास्त असल्याने बारामती येथील केंद्रावरील लसींचा साठा संपला होता. यामुळे काही नागरिकांना लस न घेताच माघारी जावे लागले होते. हीच परिस्थिती काही तालुक्यांमध्ये होती. लस संपल्याबाबत काही जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. यामुळे लसींच्या आणखी डोसची मागणी राज्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी पुणे महानगरपालीकेला ५० हजार तर पूर्ण जिल्ह्यासाठी सोमवारी १ लाख लसींचे डोस मिळाले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जनजागृतीसोबतच ग्रामपंचायतींनी नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
कोट
संपूर्ण जिल्ह्यासाठी एक लाख डोस उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ३५ हजार डोस मिळणार आहेत. ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींना लसीकरण केंद्रावर नागरिकांना घेऊन जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात याबाबत ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे
जिल्ह्यात ३५ हजार लसीच्या ३५ डोसचे असे होणार वितरण
तालुका कोव्हॅक्सीन कोविशिल्ड एकुण
आंबेगाव १०० १४० २४००
बारामती १५०० १९०० ३४००
भोर ६०० ११०० १७००
दाैंड १००० १३०० २३००
हवेली १५०० १९०० ३४००
इंदापुर १५०० १३०० २८००
जुन्नर १५०० १९०० ३४००
खेड १५०० १९०० ३४००
मावळ ८०० ११०० १९००
मुळशी ७०० १००० १७००
पुरंदर ८०० ११०० १९००
शिरुर १००० १३०० २३००
वेल्हा ४०० ९०० १३००
पुणे कॅन्टोन्मेन्ट ८०० ११०० १९००
खडकी कॅन्टोन्मेन्ट ४०० ८०० १२००
एकुण १५००० २०००० ३५०००